धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी दिलेल्या चुकीच्या माहितीला गृहीत धरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरवी धाराशिव शहरातील 59 रस्ते आणि नालीच्या कामावर स्थगिती आणली आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. यावर लवकरच तोडगा निघेल आणि कामे सुरू होतील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच नगरोत्थान योजनेतून या कामासाठी 117 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

धाराशिव शहरातील 59 रस्ते आणि नाल्यांची कामे करण्यासाठी मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून 117 कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला. हे काम सुरू झाले तर आपली अकार्यक्षमता लोकांसमोर येईल, या भीतीने काही अपप्रवृत्तीच्या राजकीय विरोधकांनी या कोमात खोडा घातला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्राचा आधार घेऊन उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे या कामांना स्थगिती दिली. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशी भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 

धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी 16 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यारंभ आदेश जारी केले होते. 28 ऑक्टोबर 2025 रोजी या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ देखील झाला. मात्र, त्याच दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्राच्या आधारावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे या कामांना स्थगिती दिली. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असेही दत्ता कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

 
Top