धाराशिव (प्रतिनिधी)- भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कार्यालयीन कामकाज सुरू असताना झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात हल्लेखोर वकील राकेश किशोर यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मानवी हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांनी केली आहे.
या संदर्भात कैलास पवार यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रमुख पदावर असलेल्या सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न हा न्यायसंस्थेवरच झालेला गंभीर आघात आहे. या कृत्याबद्दल हल्लेखोर वकील राकेश किशोर यांचा वकिली परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, तसेच त्याच्याशी संबंधित सनातन संघटनेवर बंदी घालण्यात यावी.”संघटनेच्या प्रतिनिधींनी असेही नमूद केले की, अशा प्रकारच्या घटनांमुळे देशातील न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होतो. त्यामुळे शासनाने तातडीने कठोर भूमिका घेत दोषींवर देशद्रोह व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी. “सरन्यायाधीशांवरील हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे तर लोकशाहीच्या मूलभूत स्तंभावर झालेला हल्ला आहे. दोषींना कठोर शिक्षा न दिल्यास भविष्यात असे प्रकार वाढतील.”
या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा कार्याध्यक्ष खालील पटेल, आर.पी.आय. (खरात गट) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, अरुणकुमार माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजयकुमार गायकवाड, आणि सुग्रीव कांबळे यांच्या सह्या आहेत.संघटनेने शासनाला आवाहन केले आहे की, न्यायसंस्थेवरील हल्ला हा राष्ट्रविरोधी कृत्य ठरतो, त्यामुळे दोषींवर तातडीने कठोर कारवाई करून सनातन संघटनेवर बंदी व आरोपीचा वकिली परवाना कायम रद्द करण्यात यावा.