धाराशिव (प्रतिनिधी)- दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात लागू करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे माहितीचा अधिकार दिन साजरा करण्यात आला.
प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती शेंडे यांनी केले.प्रास्ताविकातून माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे माहिती अधिकार अर्ज व अपील अर्ज यांच्या संदर्भात सर्व कर्मचारी यांनी विहित वेळेत अर्जदारास माहिती पुरविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.तसेच,अर्जांवरील कार्यवाही ठरलेल्या मुदतीत केली जाते किंवा नाही याबाबत संबंधित जनमाहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी यांनी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. माहिती अधिकार अधिनियम 2005 ची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी वेळेत निपटारा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
या प्रसंगी तहसीलदार (सर्वसाधारण) प्रकाश व्हटकर यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी माहिती अधिकाराबाबत समाजात जनजागृती वाढविण्यासाठी कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती अर्जदारास विहित मुदतीत देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.तसेच माहिती अधिकार प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शनही कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमास नायब तहसीलदार श्रीमती कांचन जाधव,नायब तहसीलदार (महसूल) एम.डी.बेजगमवार ,नायब तहसीलदार (आस्थापना) संतोष पाटील, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक उपस्थित होते.