धाराशिव (प्रतिनिधी)- महिला व बाल विकास विभागांतर्गत महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने भूम येथे ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांसाठी तालुकास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी विधी व परिविक्षा अधिकारी जे. व्ही. भाले, क्षेत्रीय कार्यकर्ता जे. आर. पाटील, केस वर्कर ए. डी. काळे, समुपदेशक व्ही. आर. कांबळे हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच प्रकल्प अधिकारी बोराडे, परिविक्षा अधिकारी आश्विनी इंगळे, इंदुमती महाले व श्रीमती मोटे उपस्थित होत्या.

प्रशिक्षणात भूम प्रकल्पातील सुमारे 180 अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या. गाव बाल संरक्षण समितीची रचना, कार्य, उद्दिष्टे तसेच बालकांचे हक्क, संरक्षण आणि जनजागृती याविषयी माहिती देण्यात आली. गावातील बालकांच्या समस्या ओळखून त्यांचे निराकरण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय योजनांद्वारे करण्याचे मार्गदर्शनही करण्यात आले.

सुधारित मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत बाल न्याय अधिनियम 2015, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, महिला संरक्षण अधिनियम 2005 यांसह जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कामकाज, प्रायोजकत्व योजना, बालसंगोपन योजना, महिला समुपदेशन कक्ष, वन्स स्टॉप सेंटर, बाल न्याय मंडळ आणि चाइल्ड लाइन यांची सविस्तर माहिती सहभागी सदस्यांना देण्यात आली.

 
Top