धाराशिव (प्रतिनिधी)- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत व्हीजेएनटी, ओबीसी व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येतो.सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील या सर्व योजनांसाठीचे तात्काळ अर्ज <http://mahadbtmahit.gov.in/> या संकेतस्थळावर 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत भरून पाठविणे आवश्यक आहे.
सन 2024-25 करिता बहुतांश विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरले आहेत,मात्र हे अर्ज सध्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी अद्यापपर्यंत अर्जांची पडताळणी करून सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाकडे सादर केलेली नाहीत.
तरी,जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांना आवाहन करण्यात येते की,सन 2024-25 करिता आपल्या महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेले विमुक्त जाती भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विषेश मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे पात्र अर्ज तात्काळ पडताळणी करून मंजुरीसाठी या कार्यालयाकडे सादर करावेत.
अर्ज सादर करताना शाळा सोडल्याचा दाखला ((T.C.) आणि गुणपत्रक ही मूळ प्रती (ORIGINAL) असावीत,याची दक्षता घ्यावी.तसेच ज्या अर्जांमध्ये त्रुटी असतील,त्यांची त्रुटीपुर्तता करूनच अर्ज मंजुरीसाठी सादर करावेत.
आपल्या महाविद्यालयाच्या लॉगिनवर एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.तसेच ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती अर्ज भरलेले नाहीत,अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी महाविद्यालय स्तरावरून तात्काळ सूचित करावे,असे आवाहन श्री.अमोल ताकभाते,सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.