धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील आळणी येथील गट.नंबर 333 येथे अर्जदार श्री.बाबासाहेब राजाभाऊ गाठे यांना मिळालेल्या “पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र“ या नावाने लोकनाट्य कला केंद्र चालविण्यास दिलेल्या परवान्याबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.या परवानाधारकाने कार्यक्षेत्रातील अटी व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने परवाना तत्काळ रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.
पूर्वी दिलेल्या आदेशानुसार पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राला लोकनाट्य कला सादरीकरण, कार्यक्रमांची अनुमती,सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रम आदींसाठी अटी व शर्ती घालून परवाना देण्यात आला होता.मात्र,परवान्यातील अटींचे उल्लंघन झाल्याने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा क्र. 192/2025 व कलम 223 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.
या कलानाट्य केंद्राच्या संचालकाने परवाना मिळालेल्या अटींचे पालन न करता बेकायदेशीर कृत्ये केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासणीत आढळून आले.त्यामुळे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला होता.या अहवालाच्या आधारे नियम क्र.226 () अन्वये सदर परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे “पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र“ (आकोळी,ता. धाराशिव) यांचा परवाना आता रद्द झाला असून पुढील काळात कोणत्याही परिस्थितीत या केंद्राला परवाना देण्यात येणार नाही,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.