धाराशिव (प्रतिनिधी)- ऑगस्ट सप्टेंबर महिण्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्हयात मोठया प्रमाणात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचा आढावा घेणेकरीता खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी, किर्तीकुमार पुजार, मुख्यकार्यकारी अधिकारी मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला.
जिल्हयातील रस्ते, पुल व पुलकम बंधाऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाकडे सदर रस्ते पुल व पुलकम बंधारे दुरुस्ती करणेबाबत प्रस्ताव पाठवून तात्काळ दुरुस्त करणेबाबत सुचना करण्यात आल्या.
20 दिवसात विद्युत विभागाने कामे पूर्ण करावीत
जिल्हयातील विविध ठिकाणी विद्युत पुरवठा अतिवृष्टीमुळे व पुर परिस्थितीमुळे खंडीत झाल्या कारणाने मोठया प्रमाणात देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. 11 के.व्ही. लाईन व अन्य कामे तात्काळ सुरु करणेबाबत तसेच भुम तालुक्यातील शिराळा सबस्टेशन व अंतरगाव सबस्टेशन जे की, पुराचे पाणी पुर्णत: बुडाले होते. ते तात्काळ सुरु करणेबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच जिल्हाभरातील विद्युत वाहक पोल अतिवृष्टीमुळे पडले असल्याने शेतकऱ्यांचा व बऱ्याच गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तो सुरळीत करणेबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच 20 दिवस मुदतीच्या आत विद्युत वितरण प्रणालीची कामे पुर्ण करुन सुरळीत विद्युत पुरवठा करावा व रब्बी हंगाम दृष्टी क्षेपात असून या हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून मोठया प्रमाणात विद्युत मागणी वाढणार असल्याचे लक्षात घेवून शेतकऱ्यांना हंगामामध्ये सुरळीत विज पुरवठा करणेबाबत सक्त सुचना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून देण्यात आल्या. तसेच जिल्हयातील फिडर सेफरेशन जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याची ताकीद देण्यात आली.
पशुधन वाहून गेल्यामुळे पोस्ट मॉर्टम रिपोर्ट नाही
जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून सर्वत्र जिल्हयात अतिवृष्टी झाली आहे. 65 मि.मी पेक्षा 138 दिवस पाऊस झाल्याने शेतीपिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जिल्हयातील 5 लाख 72 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 93 टक्के क्षेत्र बाधीत असून 2 हेक्टर क्षेत्राऐवजी शासन निर्णयानुसार 3 हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत करावी. याचबरोबर शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी झाली असून शेतकऱ्यांच्या पशुधनाचे भरपाई देताना पोस्ट मॉर्टम वाहून गेल्यामुळे शक्य नसल्याने स्थळपंचनामा ग्राहय धरुन शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांच्या विहीरीमध्ये गाळ गेल्याने त्या दुरुस्त करणेकरीता रोहयो मधून 30 हजार रुपये पर्यंत मदत देवून एकही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचना दिल्या. तसेच फळबागांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना यथायोग्य मदत करणेबाबत सुचीत करण्यात आले.
पीक कापणी प्रयोग करा
जिल्हयात पिक कापणीचे प्रयोग सुरु असून उंबरठा उत्पन्न व जोखीम पाहून पिक विमा मंजुर करण्यात येणार असल्याने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी वास्तविक पिक कापणी प्रयोग करावेत असे सांगितले. काही ठिकाणी चुकीच्या पध्दतीने कापणी प्रयोग झाल्याने शेतकरी पिक विम्यापासून वंचीत राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने संबंधीत अधिकाऱ्यांनी पिक कापणी प्रयोगातील वास्तविक उंबरठा उत्पन्न शासनास कळवावे, अशा स्पष्ट सुचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना व पिक विमा योजनेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.