मुरुम (प्रतिनिधी)- येणेगुर येथील कॅप्टन स्मारक विद्यालयातील सहशिक्षक शंकर हुळमजगे व पुणे येथे कार्यरत असलेले प्रा. राजेंद्र घोडके यांच्या वतीने दिपावलीनिमित्ताने विविध क्षेत्रातील गावातील गुणवंतांचा सत्कार व मुस्लिम बांधवांना स्नेहभोजन सोहळा रविवारी (ता. 26) रोजी आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे होते. यावेळी उद्घाटक सरपंच सौ. रेखाताई गुंजोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विजयकुमार जयशेट्टी, तात्या होळकर, ज्ञानेश्वर बिराजदार, संयोजक शंकर हुळमजगे, प्रा. राजेंद्र घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. गावातील वैद्यकीय शिक्षण घेणारे जुबेर पांढरे, आफिफा शेख, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदावर निवड झालेल्या सौ. ज्योती मुदकन्ना, नव्याने तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले सतीश पाटील यांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते संविधान ग्रंथ भेट, शाल व पुष्पहार घालून करण्यात आला. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्रा. डॉ. महेश मोटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणावर अधिक भर देऊन स्वतःची स्वप्ने स्वतः पूर्ण करावीत. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन असून विद्यार्थ्यांनी यश संपादन करून उच्च पदावर गेल्यानंतरही गावाशी असलेले नाते कमी न करता गावाच्या विकासासाठी योगदान देण्याचे आव्हान त्यांनी यावेळी व्यक्त केले. मशाख पांढरे, उस्मान शेख, अफिफा शेख, ज्योती मुदकन्ना यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समद वरनाळे, संदीप बिराजदार, प्रवीण कागे, अविनाश माळी, व्यंकट बिराजदार, ज्ञानेश्वर दूधभाते यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. शरद गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद हंगरगे तर आभार बालाजी दूधभाते यांनी मानले. कार्यक्रमानंतर मुस्लिम बांधवांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी गावातील बहुसंख्येने पालक, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top