धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील बाळासाहेब ठाकरेनगर येथील ठाकरेनगर नवरात्रोत्सव समितीच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवाची धार्मिक कार्यक्रमाने सांगता झाली. नवरात्रोत्सव कालावधीत घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
नवरात्रोत्सव समितीच्या वतीने विविध आजारांवरील रुग्णांकरिता बुधवार, दि. 24 सप्टेंबर ते मंगळवार 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या विशेष शिबिरात अॅक्युप्रेशर, सुजोक उपचार, आणि नैसर्गिक उपचार पद्धतीचा सहा दिवसांचा कोर्स जोधपूर येथील अॅक्युप्रेशर, नॅचरोपॅथी रिसर्च ट्रिटमेन्ट या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला. या शिबिरात तब्बल सातशे जणांनी नोंदणी करून सहभाग नोंदवला. ठाकरेनगर नवरात्रोत्सव समितीचे मार्गदर्शक प्रशांत साळुंके यांनी धाराशिवकरांसाठी पहिल्यांदाच ही उपचार पद्धती खास नवरात्र उत्सवाच्या काळात उपलब्ध करुन दिली होती. यावेळी नवरात्रोत्सव समितीच्या सर्व सदस्य तसेच ठाकरेनगर व परिसरातील भविक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
त्याचबरोबर महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्याचबरोबर महिला, मुलींसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर यंदाच्या महोत्सवात हरियाणवी कलाकारांच्या चित्तथरारक कसरती आणि नृत्याच्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेेतले.
तसेच पौर्णिमेनिमित्त शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बंडगर यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे नगर येथील नवरात्र महोत्सवाच्या छबिना मिरवणुकीचा विधिवत पूजा करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी नवरात्रोत्सवाचे आयोजक, संस्थापक, प्रशांत साळुंके, येरमाळा येथील येडाई देवस्थानाचे अध्यक्ष बापूसाहेब बेदरे, येडाई मंदिराचे पुजारी आबा आगलावे, परमेश्वर मेंगले व परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकरेनगर नवरात्रोत्सव समितीचे मार्गदर्शक प्रशांत (बापू) साळुंके यांनी यावर्षीही नवरात्र महोत्सव समितीमध्ये महिलांना संधी देवून नारीशक्तीचा सन्मान करण्याची परंपरा जोपासली. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.