धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील संतकृपा बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित सदगुरू जोग महाराज गोशाळेतील पशुधनासाठी साठवलेला चारा अतिवृष्टीत वाहून गेला. त्यामुळे गोशाळेतील जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहेे. त्यामुळे गोशाळेतील मोठ्या प्रमाणावर असलेल्या पशुधनाचे हाल होत आहेत. याकरिता गोशाळेमार्फत मदतीचे आवाहन करण्यात आलेले आहे. या मागणीच्या अनुषंगाने धाराशिव येथील सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती कोरे यांनी गोशाळेला भेट देऊन तात्काळ चार्‍याची व्यवस्था केली. त्याचबरोबर गोमातांचे पूजन करून सर्व जनावरांना चारा भरविला.

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये गोशाळेतील चारा व काही गोवंश वाहून गेले होते. तिथे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यानंतर  सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती कोरे यांनी वाघोली येथील गोशाळेतील जनावरांसाठी  तत्काळ गोग्रासाची व्यवस्था केली. त्या स्वतः गोशाळेला भेट व पाहणीकरिता आल्या होत्या. त्यांनी गोशाळेच्या कामाच्या स्वरूपाची संपूर्ण माहिती घेऊन गोमातेचे पूजन केले. त्यानंतर गोशाळेसाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, वर्धमान संस्कारधाम मुंबई यांच्याकडून गोशाळेस 30 बाय 50 फूट आकाराच्या चारा शेड  निर्मितीसाठी साहित्य पोहोचवले होते. परंतु पावसाअभावी ते काम स्थगित होते. त्या कामाचे भूमिपूजनही श्रीमती कोरे व उपस्थित वकिल बांधवांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदगुरू जोग महाराज गोशाळेचे अध्यक्ष आकाश महाराज मगर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.गजानन चौगुले, अ‍ॅड. गिरीश पाटील, अ‍ॅड. खोत, अ‍ॅड. निखिल शेंडगे, अ‍ॅड. सोलंकर, हभप सुधाकर बुकन, श्री शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख अभिजित  रोंधवे  उपस्थित होते. तसेच गोशाळेसाठी मदत करणारे शिवाजी मगर, अमर मगर, मंजूर तांबोळी, बप्पा मगर, नवनाथ मगर, पंकज सुलाखे, ईश्वर सुतार, बाळासाहेब जगदाळे, सुनिल मगर, गौरीनंदन गोशाळेचे गिरीश करपे तसेच श्री सिद्धेश्वर मंदिर संस्थान वडगाव मंदिर कमिटीचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी तसेच पशुपालक उपस्थित होते.

 
Top