धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील विविध रस्ते व नाली विकासकामांचे लोकार्पण तसेच नव्या कामांचे भूमिपूजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले.

प्रभाग चारमध्ये या प्रभागात एकूण 2 कोटी 18 लाख खर्चून रस्ते व नालीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. तसेच आणखी 1 कोटी 96 लाख रुपये निधीच्या माध्यमातून हाती घेण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा विकासकामांचे भूमिपूजनही याप्रसंगी करण्यात आले. 

या कामांमुळे नागरिकांना सुरक्षित, सुटसुटीत आणि नियोजित रहदारीची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत साळुंके यांनी सांगितले. त्याचबरोबर परिसरातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेलाही मोठा आधार लाभणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यात येत असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील, असेही ते म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत साळुंके, जिल्हा सचिव प्रवीण भैय्या कोकाटे, उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवासेना शहरप्रमुख अभिजीत कदम, उपशहर प्रमुख बंडू आदरकर, नाना घाटगे, अमित उंबरे, मुकुंद उंबरे, सुधीर बंडगर, चंद्रकांत गायकवाड, बाबूराव मोरे, राहुल गवळी, महेंद्र शिंदे, रोहित गाबने, दत्ता सोकांडे, अनिकेत कोळगे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बापू साळुंके यांच्या उमेदवारीबाबत चर्चा

विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात प्रभाग चारमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्साठी अहोरात्र प्रयत्न करणारे शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत साळुंके यांच्या उमेदवारीबाबत सुधीर बंडगर यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्याकडे शब्द टाकला. त्यावर लवकरच याबाबत निर्णय घेवून घोषणा करण्यात येईल, असे खासदार व आमदारांनी स्पष्ट केल्याचे सुधीर बंडगर यांनी सांगितले.

 
Top