मुरुम (प्रतिनिधी)- भारत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, शिक्षणरत्न कै. शिवाजीराव श्रीधरराव मोरे (दाजी)यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनी त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

 मा. कै. श्रीधरराव मोरे आण्णांच्या निधनानंतर 2002 पासून भारत शिक्षण संस्थेची अध्यक्षपदाची सुत्रे संचालक मंडळाने मा. श्री. शिवाजीराव मोरे (दाजी) यांच्याकडे सुपुर्द केली.  शिक्षणमहर्षी आबांची जिद्द, कर्मयोगी आण्णांच्या शैक्षणिक कार्याचा वसा घेवून 21 व्या शतकातील स्पर्धात्मक आव्हाने पेलत संस्थेची आणि महाविद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केली. महाविद्यालये, शाळांच्या इमारती अंतर्बाह्य देखण्या केल्या. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी कॉम्प्युटर्स, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्या. महाविद्यालयात नवीन प्रशासकीय इमारत, पोर्च, प्रवेशद्वार यासोबतच नवीन अभ्यासक्रम आदींच्या माध्यमातून मा. शिवाजीराव मोरे (दाजी) यांच्या विकास कार्याने झेप घेतली. डिजीटल सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातुन ग्रामीण भागातील पहिलेच पेपरलेस महाविद्यालय म्हणुन ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापिठातंर्गत संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची ‌‘उत्कृष्ठ क्षमताधिष्ठीत महाविद्यालय' म्हणून गौरविले आहे.  भारत शिक्षण संस्थेने उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत शिक्षण संस्था व संस्थेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव मोरे (दाजी) यांना राष्ट्रीय पातळीवरील ऑल इंडिया बिझीनेस डेव्हलपमेंट असोशिएशन, दिल्ली यांच्या वतीने 'भारतीय शिक्षा सुवर्ण पदक' व ग्लोबल इकॉनामिक कौन्सील, दिल्ली या संस्थेच्या वतीने 'इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार', तसेच नेशन्स इकॉनामिक फॉर हेल्थ अँड एज्युकेशन, न्यू दिल्ली या संस्थेच्या वतीने 'विद्यारत्न सुवर्ण पदक' देवून सन्मानित करण्यात आले होते. असे हे उमदे व्यक्तिमत्व अकाली 4 नोव्हेंबर 2016 रोजी अनंतात विलीन झाले. 

आज पुण्यतिथीदिनी आदरणीय दाजींचे शैक्षणिक कार्य, दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेले समर्पण आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, उपप्राचार्य जी. एस. मोरे, पर्यवेक्षक श्री एस. ए. महामुनी, प्रभारी प्राध्यापक डॉ. अशोक पदमपल्ले, डॉ. विनोद देवरकर, डॉ पी. एस. माने, प्रबंधक श्री राजकुमार सोनवणे, पर्यवेक्षक श्री नितीन कोराळे आदींसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या प्रतिमेस व पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार्पण करून अभिवादन केले.

 
Top