उमरगा (प्रतिनिधी)- मानवाचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रत्येकांनी भौतिक गोष्टीला तिलांजली देऊन काया, वाचा आणि मनाची शुद्धी करावी. प्रत्येकांच्या आनंदी जीवन जगण्याचा मार्ग म्हणजेच धम्म मार्ग आहे. या मार्गावर चालताना कोणासही दुःख होणार नाही याची काळजी प्रत्येकांनी घ्यावी. हेच समर्पित धम्म जीवनाचे मर्म असून पाच दिवसात समर्पित धम्म जीवन जगण्याचा प्रत्येकांनी सराव करावा. असे प्रतिपादन धम्मचारी अनोमकीर्ती यांनी केले.
शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरच्या वतीने ऐन दिवाळीत आयोजित करण्यात आलेल्या निवासी धम्म शिबिराचे उद्घाटन रविवारी करण्यात आले या वेळी ते बोलत होते.
धम्मपीठावर केंद्राचे चेअरमन धम्मचारी रत्नपालित,धम्मचारी प्रज्ञाजित,धम्मचारी ज्ञानपालित,धम्मचारी संमतबंधू,धम्मचारी असंगवज्र,धम्मचारी धम्मभूषण,धम्मचारी विबोध,धम्मचारी जिंनघोष,आदींची उपस्थिती होती.प्रारंभी शिबिरात दाखल झालेल्या 60 शिबिर्थीचे स्वागत करण्यात आले.पाली पूजेचे नेतृत्व धम्मचारी ज्ञानपालित यांनी केले.
उपस्थित शिबिरार्थींना संबोधित करतांना अनोमकीर्ती म्हणाले की,प्रत्येक मानवाचा मानसिक विकास होणे आवश्यक आहे. आनंदाचा निर्देशांक हा त्यांच्या धार्मीक जीवनाच्या विकासात दडला आहे.माणसे दुःखी असताना देश प्रगती करतोय असे म्हणण्यात अर्थ नाही.जेंव्हा सर्व माणसे निर्मळ मनाने जगतील तेंव्हा प्रगतीचा आलेख वाढेल.संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे “नाही निर्मळ जीवन काय करील साबण,मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणून
माणसाची मने निर्मळ करण्याचे प्रशिक्षण धम्म शिबीरात होते.जेंव्हा शिबिराच्या माध्यमातून आपण समर्पित जीवन जगतो तेंव्हा आपल्या जगण्याचा अर्थ कळतो “सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे“ मग हे पर्वता समान दुःख नाहीसं करण्यासाठी भगवान बुद्धांनी आर्य आष्ठागिक मार्ग सांगितला असून त्याचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले.
या वेळी पाहुण्यांच्या हस्ते तथागत सम्यक समबुद्धाच्या मूर्तीचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मचारी रत्नपालित यांनी केले. सूत्रसंचालन धम्मचारी ज्ञानपालित यांनी केले धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या शिबिरासाठी मारुती कांबळे, वगरसेन कांबळे, उत्तम गायकवाड, प्रियदर्शी कांबळे, मंकावती कांबळे ,तेजस्विनी गायकवाड, राजेंद्र कांबळे, सुनील कांबळे,संतोष दलाल, जी.एल.कांबळे, अजय गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत.