धाराशिव (प्रतिनिधी)- दीड वर्षापासून रखडलेल्या धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्ते कामांचे कार्यारंभ आदेश अखेर निघाले आहेत. भाजपची मंडळी याचा आता गाजावाजा करत आहेत. पण ही प्रक्रिया एवढे दिवस का लांबली यावरही त्यांनी एकदा बोलावे, असे आव्हान महाविकास आघाडीने भाजपला दिले आहे. 

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या शहरप्रमुखांनी शनिवारी संयुक्त प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. स्वतः रस्ते कामाची अडवणूक करायची. निवडणुकीच्या तोंडावर आपल्या मर्जीनुसार काम सुरू होत असल्याचा पोकळ दिखावा करायचा, ही भाजप नेत्यांची खोड आहे. आताही तोच प्रकार सुरू असल्याचा आरोप आघाडीने केला आहे. ही कामे निविदा रक्कमेपेक्षा 22 कोटींनी अधिक दराने देण्याचे प्रयत्न का सुरू होते, एका ठेकेदाराला ही कामे देण्यासाठी दीड वर्ष शहरवासियांचे हाल का केले गेले, याचे उत्तरही भाजपवाल्यांनी दिले पाहिजे, असे आव्हान आघाडीने दिले आहे. ही कामे सुरू व्हावेत म्हणून महाविकास आघाडीने वेळोवेळी आंदोलन, आमरण उपोषण, रास्ता रोको, पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शहरवासियांच्या माथी बसणारा अतिरिक्त 22 कोटींचा बोजा वाचवण्यात आघाडीला यश आले आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कामे सुरू करणे क्रमप्राप्त होतेच. 

त्यामुळे कार्यारंभ आदेश निघाला आहे. कारण काही का असेना पण शहरवासियांच्या हक्काच्या रस्त्यांना आता तरी लवकर सुरूवात व्हावी अशी अपेक्षा प्रसिध्दीपत्रकातून काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष अय्याज शेख व शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी व्यक्त केली आहे. 

 
Top