धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य गृहविभाग कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नाशिक येथे झालेल्या दोन दिवसीय ‘योद्धा प्रशिक्षण शिबिरात धाराशिव घटकातील सभासदांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत ठसा उमटवला.
धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयातून अध्यक्ष सागर करे, सोनार, चंद्रशेखर कुलकर्णी यांच्यासह सह सरचिटणीस अनिल अशोक पाटील यांनी उपस्थित राहून संघटनात्मक कामे व कार्यालयीन कामकाजाचा ताळमेळ या विषयावर मार्गदर्शन केले. राज्यातील 80 हून अधिक पोलीस कार्यालयांतील पदाधिकारी या शिबिरात सहभागी झाले. संघटन कौशल्य, कार्यालयीन शिस्त, सोशल मीडिया वापर, आर्थिक नियोजन अशा विविध विषयांवर सत्रे पार पडली.
धाराशिवची कन्या पुनम डोंगरे यांनी पर्यवेक्षीय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत जिल्ह्याचा मान वाढवला. त्या प्रत्यक्ष शिबिरात अनुपस्थित असल्या तरी त्यांचा सत्कार धाराशिवच्या सभासदांनी स्वीकारला. शिबिराला महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर, गृहविभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख, तसेच सरचिटणीस शरदचंद्र व्यापारी यांची उपस्थिती लाभली. धाराशिवच्या सभासदांच्या सहभागामुळे जिल्हा संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून हक्कांसाठी अधिक नियोजनबद्ध आणि जोमाने लढा देऊ,असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.