धाराशिव (प्रतिनिधी)-  पशुधन दगावले आहे, विहिरी खचल्या आहेत, गाळाने भरल्या आहेत तर अनेक ठिकाणी अक्षरशः शेतजमीनच महापुरामुळे खरडून गेली आहे. अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या अनुदानातून दिलासा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही अशा बिकट परिस्थितीत दिलासा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या अभुतपूर्व नुकसानीतून सावरण्यासाठी बहुभूधारक शेतकऱ्यांनाही मदत मिळावी यासाठी आपला पाठपुरावा सुरु आहे. गरजेनुसार क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून दिलासा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नुकसान भीषण आहे. जिल्ह्यातील 733 गावांना अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसलेला आहे. जिल्ह्यातील 9 जणांचा यात बळी गेला. महापुरात बुडून मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आपण तातडीने मदत दिली आहे. 9 पैकी 7 कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 28 लाख रुपयांच्या मदतीचे आत्तापर्यंत वितरण करण्यात आले आहे. दोन प्रस्ताव प्रलंबित असून त्याची रक्कमही लवकरच संबधित कुटुंबाला देण्यात येईल. संपूर्णपणे खचलेल्या विहिरींची संख्या 1397 एवढी आहे तर 286 विहिरींचे अंशतः नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील एकूण 1683 विहिरी खचल्या आहेत. यात भूम तालुक्यातील सर्वाधिक 723 विहिरींचा समावेश आहे तर त्यापाठोपाठ परंडा तालुक्यातील 540 विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव तालुक्यातील 25, तुळजापूर 30, उमरगा 28, लोहारा 16, कळंब 22 तर वाशी तालुक्यात 13 विहिरींचे नुकसान झाले आहे. जे अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्या विहिरीसाठी सरकारी अनुदान आणि मदत मिळणार आहेच मात्र बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारकडे आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


8 हजार 879 हेक्टर जमीन खरडून गेली

जिल्ह्यातील एकूण 427 गावातील तब्बल 8879 हेक्टर जमीन महापुरामुळे खरवडून गेली आहे. परंडा तालुक्यातील सर्वाधिक 3900 हेक्टर तर त्यापाठोपाठ कळंब तालुक्यातील 1761 आणि भूम तालुक्यात 1675 हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. धाराशिव तालुक्यातील 174 हेक्टर, तुळजापूर तालुक्यात 74 हेक्टर, उमरगा 362 हेक्टर आणि वाशी तालुक्यातील 498 हेक्टर जमिनीचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील 9 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर गाळ साचलेला आहे. 

 
Top