धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर ही राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राची शिखर संस्था असून सन 2027 मध्ये या संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. भारतातील निवडक वाणिज्य चेंबर्सपैकी एक असलेल्या आणि शतकपूर्तीकडे वाटचाल करत असलेली ही संस्था राज्यातील नवीन उद्योगांना चालना देणे, त्यांना तांत्रिक, कायदेशीर मार्गदर्शन करणे, उद्योजक, व्यापारी आणि शेतकरी यांच्या हक्कासाठी न्याय मागणे यासारखी अनेक कामे करणाऱ्या नामांकित संस्थेच्या पॉवर ॲण्ड एनर्जी एक्सपर्ट समितीच्या अध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी माहिती दिली.

डॉ. मुरहरी केळे यांना उर्जा आणि विद्युत क्षेत्रातील 35 वर्षापेक्षा जास्त अनुभव असून त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, त्रिपुरा राज्यांतील विद्युत मंडळात संचालक तसेच अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अशा उच्च पदांवर काम केले असून त्यांच्या कार्यकाळात उद्योग आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यांनी दहा पेक्षा जास्त मराठी आणि इंग्रजी पुस्तके लिहिली असून त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा, पत्रकारिता, माहिती तंत्रज्ञान, उर्जा अंकेक्षन आणि मराठी साहित्य या क्षेत्रातील जवळपास 12 पदव्या घेतल्या असून त्यांनी दोन विषयात पीएचडी पदव्या प्राप्त केल्या आहेत. अशा नामांकित व्यक्तीमत्व असलेल्या उच्चविद्याविभूषित आणि उर्जा आणि विद्युत क्षेत्रातील तज्ञ, तसेच वीज क्षेत्रात देशातील पहिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल राबवलेल्या डॉ. मुरहरी केळे यांची रवींद्र माणगावे यांनी संस्थेच्या पॉवर ॲण्ड एनर्जी एक्सपर्ट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून अभिनंदन केले आहे. त्यांच्या सहकार्याने उद्योग, व्यापार आणि शेती यांच्या विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे काम करणार असल्याचे तसेच त्यांच्या मार्गदर्शनानुसार सदर समितीमधील अन्य सदस्यांच्या समवेत नियमित बैठकांच्या मधून उपक्रमांचे नियोजन व क्रियान्वयन अपेक्षित असल्याची अपेक्षा चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी व्यक्त केली आहे.

 
Top