तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे त्यामुळे घडणारे अपघात, रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या सदोष गटारी त्यामुळे अनेकांच्या घरात शिरणारे पाणी याकडे दुर्लक्ष करून फुलवाडी टोलनाका येथे टोल वसुली चालू असल्याच्या निषेधार्थ सोमवार दि. 20 ऑक्टोबर रोजी पवन घुगरे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रस्ता रोको व टोल बंद आंदोलन करण्यात आले. या दरम्यान शेकडो वाहनांच्या रांगा लागल्यानंतर एसटीपीएल या टोल कंपनीने आश्वासन देवून वेळ मारून नेली.
सोमवारी सकाळी 11.30 वाजता फुलवाडी टोल नाका येथे आंदोलनास सुरूवात झाली. या दोन तासांच्या आंदोलनादरम्यान प्रशांत नवगिरे, अरविंद घोडके, बाळकृश्ण पाटील, गुरूनाथ कबाडे आदींनी कंपनीने तातडीने महामार्ग रस्ता दुरूस्त करून घरात शिरणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावून भरपाई द्यावी, त्यानंतरच टोल वसुली करावी अशी मागणी केली. अखेर टोल वसुली बंद केल्यानंतर व लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.