धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या एक ते दीड महिन्यापासून नाट्यगृहासमोर पालिकेची जलवाहिनी फुटली आहे. यामुळे येथे पाण्याचा अपव्यय होत आहे. तसे चपाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात चिखलही निर्माण झाला आहे. वाहनधारक व पादचाऱ्यांना येथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
शहरात गेल्या काही दिवसपासून कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. सर्वत्र अस्वच्छता आणि रस्त्यावरील खड्डे हीच धाराशिव शहराची ओळख बनली आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे विकासकामे करता येत नसल्याचे नगर पालिकेच्यावतीने वारंवार सांगण्यात येते. मात्र पालिकेच्या हद्दीत असलेल्या सहज सुटणाऱ्या समस्यांकडेही दुर्लक्ष होत आहे. नगरपालिकेच्या कार्यालयाच्या अगदी जवळ असलेल्या लहुजी वस्ताद साळवे चौकात आणि छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोरच जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटून आता एक ते दीड महिना उलटला तरी दुरूस्तीचे काम सुरू झालेले नाही.