तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीत सोमवारी दि. 20 ऑक्टोबर रोजी सोमवती अमावस्या दिनी रात्री पारंपरिक पद्धतीने काळभैरव मंदीरातुन आगीचे लोळ अंगावरून वाहून नेणारा भेंडोळी उत्सव भक्तिभावात, “उदोऽऽ उदोऽऽ”च्या गजरात आणि संभळाच्या कडकडाटात संपन्न झाला.

तुळजापूर नगरी ही उत्सवप्रिय नगरी असून येथे वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी अश्विनी अमावस्येला साजरा होणारा भेंडोळी उत्सव हा अंगावर शहारे आणणारा आणि भक्तिमय वातावरण निर्माण करणारा आहे.या सोहळ्यास विश्वस्त तथा आ राणाजगजितसिंहपाटील पुञ मल्हार पाटील  उपस्थित होते.

संध्याकाळी काळभैरव मंदिरात अमावस्या प्रारंभ होताच काळभैरवाची आरती करण्यात आली. त्यानंतर  विश्वस्त तथा तहसिलदार अरविंद बोळंगे  तहसीलदार तथा मंदिर समितीच्या प्रशासकीय व्यवस्थापक माया माने, धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, काळभैरवांचे पुजारी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीजींच्या पोताने ही भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली.

यानंतर शेकडो युवकांनी  उघड्या अंगाने आगीची  ज्वाला असणारी  भेडोळी खांद्यावर घेत संभळाच्या कडकडाटात आणि “काळभैरवाचे चांगभलंऽऽ”च्या गजरात काळभैरवाच्या कड्यावरून महंत तुकोजी बुवांच्या मठाजवळ आणली. तिथे महंत चिलोजीबुवा आणि महंत तुकोजीबुवा यांनी पूजन केले. ही भेंडोळी नंतर सवाफुटी वळणाच्या बोळातून राजे शिवाजी दरवाजा मार्गे मंदिरात नेण्यात आली.

मंदिरात महंत मावजीनाथ बुवा यांच्या हस्ते दत्त मंदिरासमोर भेंडोळीचे पूजन करण्यात आले. त्यावर तेल ओतल्यानंतर वाढलेल्या आगीचा लोळ असलेली भेंडोळी देवीच्या सिंहगाभाऱ्यात नेण्यात आली. तेथे प्रदक्षिणा घालून भवानीशंकर गाभाऱ्यातून होमकुंडासमोर येऊन पुन्हा प्रदक्षिणा देण्यात आली.

यानंतर ती राजे शहाजी महाद्वारातून, आर्य चौक मार्गे जात कमानवेस येथील डुल्या हनुमान मंदिरात आणण्यात आली.तेथे विधीवत पूजन करून अहिल्यादेवी होळकर विहिरीतील पाण्याने भेंडोळी विजविण्यात आली. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे काशी तीर्थक्षेत्रात फुलांची भेंडोळी वाहिली जाते, तर तुळजापूरात आगीच्या लोळाची भेंडोळी वाहिली जाते. त्यामुळे हा उत्सव अद्वितीय आणि भक्तिभावाने भारलेला असतो.



दशावतार मठाशी निगडित परंपरा 

पूर्वी सिध्दगणेश दशावतार मठाचे महंत गरीबनाथ बुवा यांनी देवीला काशीला जाण्याची परवानगी मागितली. देवीने त्यांना सांगितले की “गंगेचे पाणी तुळजापूरातील श्रीगोमुख तीर्थकुंडात येते, तुला काशीला जाण्याची गरज नाही.” तरीही त्यांनी हट्टाने काशीला जाऊन पूजेचे साहित्य गंगेत अर्पण केले. परतताना खळखळ आवाज ऐकून त्यांनी मागे वळून पाहिले आणि तुळजापूरात परतल्यावर देवीसमोर गेल्यावर देवीने सांगितले, “तू माझे वचन पाळले नाहीस. आता तुला वर्षातून फक्त अश्विनी अमावस्येलाच माझे दर्शन घेता येईल.” तेव्हापासून दशावतार मठाचे महंत वर्षातून फक्त या दिवशीच देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदीरात येतात. या परंपरेनुसार यंदा महंत मावजीनाथ बुवा यांनी देवीला सिंहासन पूजा, कुलधर्म कुलाचार करून मनोभावे दर्शन घेतले. आगीचा लोळ, संभळाचा गजर आणि श्रद्धेचा जाज्वल्य आविष्कार  या सर्वांनी तुळजापूर पुन्हा एकदा “तीर्थक्षेत्र भक्तिभावाची जिवंत नगरी” ठरवली.


 
Top