धाराशिव (प्रतिनिधी)- गूळ पावडर कारखान्यांनी जाहीर  केलेल्या 2400 रुपये ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 400 रुपये कमी भाव दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय झाल्यास एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे व इतर पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्हयातील गुळ पावडर कारखानदार यांच्या सर्वसाधारण बैठकीत चालू हंगामातील उसाला 2400 रुपये दर जाहिर केला आहे. त्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे. मागील  हंगामात जाहीर केलेल्या दरापेक्षा चालू हंगामात 400 रुपये कमी दर दिला आहे. चालू हंगामातील भाव कमी केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना याचा जाहीर निषेध करत आहे. यावर्षी निसर्ग कोपल्यामुळे शेतकरी आधीच मेटकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत  कारखानदार शेतकऱ्यावर  असा अन्याय करत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना एकाही गुळ पावडर कारखान्याचे धूराडे पेटू देणार नाहीं. जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. होणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे. 

निवेदनावर जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, विजय काळे, पंकज पाटील, शहाजी सोमवंशी, सचिन टेळे, हनुमंत कापसे, धनाजी पेंदे, कमलाकर पवार, चंद्रकांत समुद्रे व इतर पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास भेट देऊन चर्चा केली.

 
Top