धाराशिव (प्रतिनिधी)- लिंगायत समाजाला संविधानिक धर्माची मान्यता देण्यात यावी, यासाठी आजपर्यंत विविध ठिकाणी महामोर्चे काढले. मात्र, अद्यापपर्यंत सरकारने या धर्मास स्वतंत्र लिंगायत धर्माची मान्यता दिली नाही. आरएसएस व भाजपा लिंगायत समाजाला हिंदू धर्म असल्याचे भासवतात. परंतू लिंगायत समाजाच्या लग्न सोहळा व अंत्यविधी आदींसह इतर विविध विधी या ब्राह्मणा ऐवजी जंगम यांच्या माध्यमातून पार पाडल्या जातात. त्यामुळे लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी धाराशिव येथे 27 वा महामोर्चा काढण्यात येणार असल्यासची माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक अविनाश भोसीकर यांनी दि.5 ऑक्टोबर रोजी दिली. दरम्यान, या मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड प्रणित डिकले, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, बसवेश्वर हिंगणे, परमेश्वर पाटील, किशोर पाटील व विकास बनसोडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना भोसीकर म्हणाले की, 8 कोटी लिंगायत जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपची काही मंडळी जनगणने चुकीची माहिती देण्यासाठी सांगत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. जातनिहाय जनगणना करणे अत्यंत आवश्यक असून त्यामध्ये इतर धर्मांसाठी सहा कॉलम असून लिंगायत धर्माचा कॉलम नाही. त्यामुळे येणाऱ्या जनगणनेच्या अर्जामध्ये लिंगायत धर्माचा सातवा रकाना करण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे राष्ट्रीय स्मारक स्थापन करण्यात यावे. समाजाच्या रेट्यामुळे शासनाने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. त्यास निधी अपुरा असून एक हजार कोटी रुपयांचे बजेटची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करून ते म्हणाले की, धाराशिव येथे काढण्यात येणाऱ्या महामोर्चास महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लिंगायत समाजबांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लिंगायत समाजाला संविधानिक मान्यता देण्यात यावी या मागणीस इतर कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिला नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यामुळे भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही शिवसेना व इतर पक्ष संघटनांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी करीत ते म्हणाले की, जे-जे पक्ष आम्हाला पाठिंबा देतील त्यांना या मोर्चाचे निमंत्रण देण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
लिंगायत हा धर्म असून 2011 च्या जनगणनेमध्ये लिंगायत बांधवांनी धर्माच्या रकान्यात लिंगायत लिहायला हवे होते. परंतू त्यांनी त्या ठिकाणी जात लिहिले आणि जातीच्या रकान्यात वाणी, तेली, माळी, कुंभार, सुतार आदींचा समावेश केला. हा प्रकार सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात झाला असून त्याची सरकारने शुद्धिपत्रकाद्वारे दुरुस्ती करून लिंगायत समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. भाजपला हिंदूंच्या अडून पुन्हा मनुवादी व्यवस्था आणायची असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हिंदू आमचे बांधव आहेत. आम्हाला सरकार हटवायचे नाही तर व्यवस्थाच हटवायची असून ती हटविण्यासाठी आमचा संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.