तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य आज ऊर्जानिर्मितीच्या नकाशावर देशात पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र ऊर्जा वापराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर! या विषमतेमुळे राज्यासमोर उर्जा तुटवड्याचे आव्हान उभे आहे. पारंपरिक ऊर्जा साधनांवर अवलंबून राहून हे आव्हान पेलणे शक्य नाही. त्यामुळे आता राज्याने ठाम पावले उचलत “हरित ऊर्जा निर्मिती”कडे वाटचाल सुरू केली आहे.


धाराशिव जिल्हा ठरणार “हरित ऊर्जेचे केंद्रस्थान”

धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक रचना सौर आणि पवन ऊर्जेसाठी अत्यंत अनुकूल असल्याने, राज्य सरकारने येथे हरित ऊर्जेचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.वाशी, भूम आणि कळंब तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांमुळे हजारो मेगावॅट हरित वीज निर्मितीची क्षमता निर्माण झाली आहे.. स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून काही ऊर्जाउद्योगांनी सहकार्याचे हात पुढे केले आहेत. “ऊर्जा विकास आणि शेतकरी संरक्षण  दोन्ही साध्य करणे शक्य आहे” असा संदेश या प्रकल्पांमधून दिला जात आहे.

 

राज्य सरकारचा 2 लाख कोटींचा “ऊर्जा क्रांती” आराखडा

ऊर्जा वापर आणि निर्मिती यातील तफावत कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार तब्बल 2 लाख कोटींची गुंतवणूक करत आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस स्वतः या ट्रान्समिशन आणि हरित ऊर्जेच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले, तर महाराष्ट्र केवळ ऊर्जास्वावलंबीच नव्हे, तर “हरित ऊर्जेचा अग्रणी” राज्य ठरेल.


पारंपरिक ऊर्जेचे दुष्परिणाम

दगडी कोळशावर आधारित पारंपरिक ऊर्जानिर्मितीमुळे निर्माण होणारी राख शेतजमिनीत मिसळल्यास जमिनी नापीक होतात, हे गंभीर वास्तव आहे. त्यामुळे वीज निर्मितीचा दर वाढवतानाच पर्यावरण रक्षणाचाही समतोल राखणे ही काळाची गरज आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडत आहे. महाराष्ट्राने ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेतली असून गेल्या तीन वर्षांत 45 हजार मेगावॅट क्षमतेची निर्मिती करण्यासाठी काम सुरू केले आहे. राज्याने 2035 पर्यंतचे संपूर्ण नियोजन आखले आहे. हरित ऊर्जा निर्मिती, विश्वासार्ह वितरण जाळे आणि उद्योगांना स्थिर वीज  या तिन्ही गोष्टींवर आपला भर राहील. 2025 ते 2030 दरम्यान वीजदर दरवर्षी 2% ने कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”.. धाराशिवसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले सौर, पवन आणि जैवऊर्जेचे प्रकल्प हे फक्त वीज निर्मिती नव्हे, तर “स्वच्छ, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक विकासा”चे प्रतीक ठरत आहेत.हरित महाराष्ट्र कडे वाटचाल सुरु असल्याचे दिसुन येत आहे.

 
Top