धाराशिव (प्रतिनिधी)- सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उमरगा तालुक्यातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले.या अतिवृष्टीमुळे तब्बल 295 घरामध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य भिजले,तर त्यांचा धान्य साठाही नष्ट झाला.गावोगावी जनजीवन विस्कळीत झाले होते.अशा कठीण काळात शासन लोकांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र आता उमरगा तालुक्यात दिसत आहे.

जिल्हाधिकारी श्री.कीर्ती कुमार पुजार यांच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोफत धान्य वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ शासनातर्फे देण्यात येणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करताना उमरगा तालुक्यातील 27 गावांचा समावेश करण्यात आला असून,एकूण 295 कुटुंबे या योजनेचा लाभ घेणार आहेत.यापैकी 272 कुटुंबांना धान्याचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे, तर उर्वरित कुटुंबांपर्यंत पुढील दोन दिवसांत हा दिलासा पोहोचविण्यात येणार आहे.

पूरग्रस्तांना धान्य मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला.एकीकडे संसार उध्वस्त झाल्याची वेदना असली तरी शासनाची मदत वेळेवर मिळाल्याने जगण्याची नवी उमेद त्यांना मिळाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.अनेक जणांच्या डोळ्यात पाणी तरळले, कारण संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,याचा खरा दिलासा त्यांना मिळाला आहे. जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी प्रशासनाला काटेकोरपणे धान्य वितरणाचे आदेश दिले असून,एकही कुटुंब वंचित राहू नये यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत शिल्लक कुटुंबांपर्यंत धान्य पोहोचविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. उमरगा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी शासनाची ही धान्य मदत म्हणजे अंधाऱ्या काळात दिलासा देणारा किरण ठरला आहे.

 
Top