धाराशिव (प्रतिनिधी)- ढोकी येथील अत्याधुनिक बसस्थानकाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाघ यांना दिले आहेत. अशी माहिती बस स्थानकासाठी पाठपुरावा करणारे शिवसेनेचे राज्य आंदोलन समन्वयक अॅड. तुकाराम शिंदे यांनी दिली.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारण्याबाबत गुरूवारी (दि.16) सकाळी 11 वाजता मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस या बैठकीस धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे व्हीसीद्वारे सहभागी झाले. तर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक, राज्य आंदोलन समन्वयक अॅड. तुकाराम शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ढोकी येथे एका चिमुकलीला अपघातामध्ये प्राण गमवावे लागले असल्याचे परिवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. ढोकी येथे अत्याधुनिक बस स्थानक उभारण्याची कशी गरज आहे हे अॅड. तुकाराम शिंदे यांनी मुद्देसूदपणे स्पष्ट केले.
त्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक यांनी ढोकी येथील अत्याधुनिक बस स्थानकासाठी कृषी विभागाची जागा मिळवून घेण्याकरिता तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकार्यांना दिले. तर ढोकी येथील सध्याच्या बस स्थानकाजवळ मृत्यू झाला तिथे गतिरोधक करावा आणि ढोकी पेट्रोलपंप ते गाव या मार्गावर चार गतिरोधक तयार करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाघ यांना थेट फोन करून आदेश दिले. तसेच अत्याधुनिक बस स्थानकासाठी पाच ते दहा कोटी रुपयापर्यंत निधी देण्याचे प्रयोजन करावे असे आदेशही त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. त्यामुळे बसस्थानक उभारणीच्या कामाला लवकरच सुरूवात होईल, असे अॅड. तुकाराम शिंदे यांनी म्हटले आहे
