वाशी (प्रतिनिधी)- बीड येथे झालेल्या अंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत समीर आनंद पानगावकर या विद्यार्थ्याने उत्कृष्ट कामगिरी करत उज्वल यश संपादन केले असून त्याची निवड विद्यापीठ संघात झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयात समीरच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. रवी चव्हाण, समीरचे पालक आनंद पानगावकर, कार्यालयीन अधीक्षक मोहन डोलारे, ग्रंथपाल प्रा. राहुल कुलकर्णी, मुख्यालिपिक श्री. शिवाजी साळुंखे, स्वप्निल शेळकांदे व दत्ता फुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. अशोक कदम यांच्या हस्ते समीरचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवी चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. एम. डी. उंदरे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. राहुल कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
