धाराशिव (प्रतिनिधी)-  आज सर्वत्र “विकास-विकास” अशी चर्चा ऐकू येते; मात्र विकास म्हणजे केवळ गुळगुळीत रस्ते, विमानतळे किंवा महागड्या गाड्या नव्हेत. “मानवाच्या मूलभूत गरजा  जिवंत राहणे, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य  पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही समाजाला विकास झाल्याचे म्हणता येत नसल्याचे प्रतिपादन डॉ.स्मिता शहापूरकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्त्री मुक्ती परिषद व लातूर जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय स्त्री मुक्ती परिषद हॉटेल अंजनी लातूर येथे संपन्न झाली. यावेळी त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. या परिषदेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडबोले, डॉ. स्मिता शहापूरकर ,प्रा. डॉ.अशोक नारनवरे, सुनीता बागल, संध्या गोखले, उपस्थित होते. डॉ. स्मिता शहापूरकर पुढे बोलताना म्हणाल्या की, समाजात विकासाचे फळ काही मोजक्यांच्या हातात जमा होत आहे, तर बहुसंख्य लोक अजूनही गरिबी, असुरक्षितता आणि अन्यायाचा सामना करत आहेत. “विकास म्हणजे भौतिक संपत्ती नव्हे; तर विचारांनी आणि संधींनी समानतेकडे जाणे हा खरा विकास आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकार जावेद शेख, प्रा.डॉ. अशोक नारनवरे, सुनीता बागल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुचेता शास्त्री- वाघमारे व सुनिता कुलकर्णी मूकबधिर विद्यालय लातूरच्या माजी मुख्याध्यापिका यांनी महिलांची सद्यस्थिती दर्शविणारी एक नाटिका सादर केली.या कार्यक्रमात  कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. चंद्रकला भार्गव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय सुरवसे यांनी केले. ॲड. सुजाता माने यांनी उपस्थितचे आभार व्यक्त केले. 

 
Top