तुळजापूर (प्रतिनिधी)- दीपावलीच्या सुट्यांमुळे तुळजापूरमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गुरुवार व शुक्रवार रोजी प्रचंड गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने तात्काळ ॲक्शन मोडमध्ये येत व्हीआयपी दर्शन व्यवस्था शुक्रवार दुपारपासून स्थगित केली.
वाढती गर्दी पाहता विश्वस्त व तहसीलदार तसेच प्रभारी प्रशासकीय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी परिस्थितीचा विचार करुन. तत्काळ निर्णय घेत
बिडकर पायऱ्यांवरून देवीदर्शनाची व्यवस्था करण्यात आली. तसेच 200 रूपये सामान्य पास आणि 200 रूपये रेफरल पास या दोनही प्रकारच्या पासेस बंद करण्यात आले. फक्त 500 सशुल्क सिंहासन, अभिषेक पास सुरु ठेवण्यात आला. हे पास प्रशासकीय कार्यालयातील तळ मजल्यातून वितरित करण्यात येत आहेत. आणि अशा पासधारकांना राजशाही महाद्वार मार्गे दर्शनाची संधी देण्यात आली.
प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईमुळे शनिवारी रविवार मंदिर परिसरात शिस्तबद्ध वातावरण निर्माण झाले. अधिकारी व कर्मचारी यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना सेवेत कार्यान्वित करण्यात आल्याने, गर्दी असूनही भाविकांना दर्शन घेता आले. शनिवारी, रविवार सकाळी दर्शनाच्या रांगा बिडकर पायऱ्यांपर्यंत आल्या होत्या. मात्र धार्मिक नियोजनामुळे कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नाही. तुळजाभवानी मातेच्या कृपेने आणि प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे भाविकांना शांततेत दर्शन घेण्याचा अनुभव आला.