धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे, सोयाबीन, कांदा, उडीद, तूर, उस तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांना  1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर विविध मागणीसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.3 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यासह विविध भागात अतिवृष्टी व पूराने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात माणसे, जनावरे, उभे पीक मातीसह वाहून गेले आहे. तर काही जनावरे दावणीलाच मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना या आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी प्रती हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांना प्रती हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देण्यात यावेत. तर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. त्याबरोबरच सोयाबीनला 6 हजार रुपये हमीभाव देण्यात यावा. विशेष म्हणजे कापणी प्रयोग रद्द करुन सरसकट पीक विमा देण्यात यावा. साखर कारखान्याच्या ऊस बिलातून सरकारने जाहीर केलेला 15 रूपये कपातीचा निर्णय रद्द करावा आदी मागण्या करण्यात आल्या. 

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड धीरज पाटील, प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार, राजाभाऊ शेरखाने, सय्यद खलील, प्रशांत पाटील, सयाजी देशमुख, प्रकाश चव्हाण, बालाजी बंडगर, विलास शाळू, अग्निवेश शिंदे, मेहबूब पाशा पटेल, उमेश राजेनिंबाळकर, हनुमंत वाघमोडे, शामसुंदर तोरकडे, धनंजय राऊत, आयुब पठाण, जावेद काझी, अशोक बनसोडे, सरफराज काझी, सुरेंद्र पाटील, अशोक शेळके, अमोल कुतवळ, तनुजा हेड्डा, शीलाताई उंबरे, अंजली ढवळे, प्रभाकर लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


 
Top