धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील मुख्य बसस्थानक परिसर हा शहराच्या वाहतुकीचा केंद्रबिंदू असताना, येथे वाढत्या ऑटो रिक्षांच्या मनमानी पार्किंगमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे. बसस्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बस, प्रवासी आणि नागरिक यांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच समोरील रस्त्यांवर ऑटो रिक्षा चालकांनी अक्षरशः अतिक्रमण करून ठेवले आहे. ठराविक रिक्षा स्टँड असूनही अनेक चालक रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करतात, प्रवाशांची हुज्जत करतात, त्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना प्रचंड गैरसोय भासते.

वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी व कर्मचारी या सगळ्या गोंधळाकडे डोळेझाक करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. “दररोजचा गोंधळ, हॉर्नांचा आवाज, बस थांबवण्यास जागा नाही, तरीही कुणी कारवाई करत नाही,“ अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.

वाहतूक नियंत्रणासाठी प्रशासनाने काही वर्षांपूर्वी बसस्थानक परिसरात सिग्नल, रिक्षा स्टँड, पार्किंग झोन तयार केले होते. मात्र आता ते सर्व केवळ कागदावरच राहिले आहे. प्रत्यक्षात कोणीही नियम पाळत नाही, आणि पोलिसांचं दुर्लक्ष या समस्येला अधिक तीव्र बनवत आहे.

नागरिकांमध्ये आता प्रश्न उपस्थित होत आहे की, वाहतूक शाखा नेमकी कधी जागी होणार? शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर या अराजकतेला आळा घालण्यासाठी तातडीने कारवाई आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

 
Top