धाराशिव (प्रतिनिधी)-  “आपत्तीने भूमी हादरली, पण माणसाचा आत्मविश्वास डगमगला नाही” या वाक्यात साडेसांगवीकरांच्या जिद्दीचं सार दडलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुराच्या तडाख्यात सापडलेल्या या भूमीत आज पुन्हा आशेचे दिवे पेटले आहेत. आपत्तीच्या छायेतून नव्या उजाडीकडे वाटचाल चालू आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी रात्री भूम तालुक्यातील पूरग्रस्त साडेसांगवी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील हनुमान मंदिरासमोर दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगा,सून व नातू ,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, सहायक जिल्हाधिकारी रैवैयाह डोंगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की,“मी तुमच्या दु:खात सहभागी आहे आणि साडेसांगवी पुन्हा फुलवणं ही आमची जबाबदारी आहे.”साडेसांगवी हे केवळ एक गाव नाही,तर शेतकऱ्यांच्या श्रमाची आणि जनतेच्या आत्मविश्वासाची भूमी आहे. तब्बल 173 हेक्टरवरील पिकं वाहून गेली, 281 शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग, उडीद, द्राक्ष आणि केळी पिकं नष्ट झाली. काहींची जमीनच खरडून गेली. तरीही त्यांनी आशेचा दिवा विझू दिला नाही असे सरनाईक म्हणाले.

यावेळी पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. पुराच्या पाण्याने घरात घुसून कपडे,भांडी, वस्तू वाहून गेल्या.शासनाने या 42 कुटुंबांना तातडीने मदत म्हणून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. सहा घरांची पडझड झाली.दत्तात्रय डोंबाळे यांच्या एका जनावराच्या मृत्यूमुळे या शेतकऱ्याचे नुकसान झाले.शासनाने त्यांना 20 हजार रुपयांचे सहाय्य देऊन मदत केली. कार्यक्रमानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी गावाजवळील नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व साडेसांगवी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top