तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील मौजे बारुळ येथील बारुळ-जवळगा (मेसाई) रस्त्यालगत असलेला कंपनीचा सिमेंट काँक्रीट मिक्सर प्लांट गेल्या वर्षभरापासून बेकायदेशीररित्या सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामपंचायतीने या प्लांटला पूर्वीच नोटीस बजावून बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कंपनीने ग्रामपंचायतीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत “आमच्यावर कोणाचे नियंत्रण नाही” अशा मग्रूर पद्धतीने प्लांट सुरूच ठेवला आहे.

ग्रामपंचायतीच्या हद्दीत असूनही संबंधित प्लांटने कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. त्यातच या प्लांटमधून उडणाऱ्या धुळीमुळे शेकडो एकर शेती जमीन नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप आहे. याशिवाय, या प्रकल्पातून उत्खनन करण्यात आलेल्या मुरुमाची रॉयल्टी भरलेली नसल्याचे समजते. प्लांट व्यवसायिक वापरासाठी उभारण्यात आला असतानाही त्यासाठी आवश्यक अकृषिक परवानगी घेण्यात आलेली नाही.


“सर्व काही प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असताना अधिकारी मात्र मूग गिळून गप्प का?”ग्रामस्थांनी या अनधिकृत प्लांटविरोधात तुळजापूर तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित प्लांट तात्काळ बंद करून जबाबदारांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या निवेदनात करण्यात आली आहे. आता पाहावे लागेल की तहसील प्रशासन आणि सा.बां. विभाग या बेकायदेशीर प्लांटच्या प्रश्नावर खरंच कारवाई करतात की नेहमीप्रमाणे फाईल ढकलून वेळ मारून नेतात.

 
Top