तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी नियोजन, आढावा अशा बैठकांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले गेले. यातून भाविकांच्या सेवा सुविधांसंदर्भात विविध विभागांना योग्य त्या उपाययोजनांचे आदेश ही देण्यात आले. परंतु, या आदेशांना सार्वजनिक बांधकाम विभागाने फाट्यावर मारल्याचे दिसून येत आहे.
पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवाच्या आदेश देऊनही तिर्थक्षेत्र तुळजापूरकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यालगतची झाडेझुडपे वेळेत काढलीच गेली नाहीत. घाटशिळ घाटातील रस्त्यालगतची झाडेझुडपे जैसे थे असल्याने पायी चालत येणाऱ्या भाविकांना मोठा फटका बसला. दिवसा वाहतुकीस अडथळा, किरकोळ अपघात तर रात्री
पायी चालणाऱ्या भाविकांना वन्यजीवांसह सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास अशी स्थिती झाली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत खड्डे बुजवणे, झाडेझुडपे काढणे ही जबाबदारी बीएन्डसीवर सोपवण्यात आली होती. प्रत्यक्षात काम न होता फक्त बैठकीपुरते नियोजन राहिले. यामुळे भाविक व नागरिकांतून संताप व्यक्त होत असून 'जी कामे केलीच नाहीत, उशीरा केले जात आहेत त्यांची बिले काढू नयेत व झालेल्या खर्चाची चौकशी व्हावी' अशी मागणी होत आहे.