धाराशिव (प्रतिनिधी)- एसटी आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नांदेड येथे आदिवासी बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात राज्यातून लाखो आदिवासी पारधी बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.
आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काळे म्हणाले की, एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे म्हणून काही बोगस आदिवासी प्रयत्न करत आहेत. एसटी प्रवर्गात आधीच 45 जमातींचा समावेश आहे. त्यात आदिवासी पारधी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने या समाजावर नेहमीच अन्याय झाला आहे. आज आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्रातील 28 ते 30 जिल्ह्यात कार्यरत आहे. या सर्व जिल्ह्यातील आदिवासी पारधी बांधव मोर्चात सहभागी होत आहेत.
एसटी समाजाचे आरक्षण अबाधित राखण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण आम्ही कोणाला हिसकावून घेऊ देणार नाही. आज आमच्यासोबत एससी प्रवर्गातील 59 जमाती आमच्या सोबत आहेत. आम्ही कोणाचे आरक्षण मागत नाही पण आमच्या ताटातले पण कोणाला देणार नाही. म्हणून सरकारला जाणीव करून देण्यासाठी काढण्यात येत असलेल्या या मोर्चात सहभागी होण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 25 हजाराहून अधिक आदिवासी पारधी समाज बांधव निघाले आहेत, असेही काळे यांनी सांगितले.