धाराशिव (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध कवी राजेंद्र अत्रे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जाहीर नागरी सत्कार रविवारी 12 ऑक्टोबर रोजी स्व.व्यंकटेश महाजन महाविद्यालयाजवळील स्व.प्रमोद महाजन सभागृहात सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे.
अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव,अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा धाराशिव, कलाविष्कार अकादमी धाराशिव,पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या अमृत महोत्सव वर्षानिमित्तच्या जाहीर नागरी सत्कार समारंभासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती असणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध विधीज्ञ मिलिंद पाटील हे असणार आहेत. तर अखिल भारतीय साहित्य महामंडळ पुणेचे अध्यक्ष श्री मिलिंद जोशी यांच्या शुभहस्ते हा भव्य नागरी सत्कार संपन्न सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश, नांदेड श्री सुनील वेदपाठक तसेच अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्था पुणे याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.राजन लाखे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे याचे लातूर येथे असलेले कार्यकारी परिषद सदस्य श्री. प्रवीण सरदेशमुख यांची उपस्थिती असणार आहे.
या जाहीर नागरी सत्काराच्या निमित्ताने श्री राजेंद्र अत्रे यांची ग्रंथतुला केली जाणार आहे तसेच त्यांच्या साहित्यिक वाटचालीचा आणि साहित्यातून उमटलेल्या साहित्य प्रतिभेच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन यावेळी केले जाणार आहे. श्री राजेंद्र अत्रे सर यांच्या निवडक कवितांचे वाचन या निमित्ताने केले जाणार असून त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना मानपत्र देऊन भव्य सत्कार केला जाणार आहे. या जाहीर नागरी सत्कारासाठी नागरिकांनी तसेच साहित्यिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री राजेंद्र अत्रे नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.