भूम (प्रतिनिधी)- विद्या विकास मंडळ संचलित शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथे “महिला सुरक्षा व कायदा” या अत्यंत महत्वाच्या आणि समाजजागृतीपर विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून भूम पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. गणेश कानगुडे उपस्थित होते.
आपल्या प्रभावी आणि माहितीपूर्ण भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना महिला सुरक्षेसाठी शासनाने लागू केलेले विविध कायदे, महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, छेडछाड, सायबर गुन्हे, तसेच महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणा यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याबद्दल जागरूक राहण्याचे, समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे आणि महिला सन्मान रक्षणात आपली सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संतोष शिंदे होते.तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डी. डी. बोराडे ,सचिव काटे एम बी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.गंगाधर काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. धनश्री पिंपरे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला सक्षमीकरण, कायदेशीर हक्कांची जाणीव आणि सुरक्षित समाजनिर्मिती यासाठी असे उपक्रम सातत्याने आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी पोलिस निरीक्षक कानगुडे यांचे मन:पूर्वक आभार मानून विद्यार्थ्यांनी या व्याख्यानातून मिळालेल्या माहितीचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे सांगितले.