धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामांना स्थगिती मिळाल्यानंतर पुन्हा एकदा शहरातील राजकारणाने जोर धरला आहे. भाजप आणि शिवसेना (उबाठा गट) या दोन सत्ताधारी गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता ही लढाई रस्त्यावर आणि सोशल मीडियावरून पोस्टर युद्धात परिवर्तित झाली आहे. काल सोशल मीडियावरून एकमेकांवर आरोप करणाऱ्या नेत्यांनी आज पोस्टरबाजीच्या माध्यमातून एकमेकांना टोले लगावले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आज सकाळी “धाराशिवकर विचारतायेत, शहरातील रस्त्यांची कामं गेल्या 18 महिन्यांपासून कोण थांबवली? आणि कोणासाठी? उत्तर द्यायला धैर्य आहे का?” असा सवाल करणारी मोठी होर्डिंग्ज झळकली. या होर्डिंग्जवर कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्याचे नाव नसल्यामुळे ती नेमकी कोणत्या गटाने लावली हे स्पष्ट झालेले नाही, मात्र त्यावरून शहरात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करावीत या मागणीसाठी आज सकाळपासूनच काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत. रस्त्यांच्या वाईट अवस्थेमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. “शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरले असून नागरिकांच्या हालअपेष्टा लक्षात घेऊन तातडीने कामे सुरू करण्यात यावीत,” अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आघाडीच्या नेत्यांनी प्रशासनावर आणि सत्ताधारी पक्षांवर शहराचा विकास राजकारणाच्या भोवऱ्यात अडकविल्याचा आरोप केला आहे.


 
Top