धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत बॅनर लावण्याची स्पर्धा सुरू केली आहे. “हीच तुझी लायकी,” “धाराशिवच्या विकासाचा नुसता भास, कमिशन घेऊन केला स्वतःचा विकास” अशा आशयाचे फलक झळकत असून, हे बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
धाराशिव शहरातील रस्त्याच्या कामांवरील स्थगिती निर्णयानंतर राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका करणारे बॅनर लावले आहेत. तर सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर देत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांना लक्ष्य करणारे फलक झळकवले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही पक्षांच्या बॅनरांवर नगरपरिषदेचा परवाना क्रमांक किंवा क्यूआर कोड नसल्याने ही बॅनरबाजी थेट नियमांचे उल्लंघन करणारे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच असे अनधिकृत बॅनर लावले आहेत. त्यामुळे प्रशासन काय कारवाई करणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांच्या कामांवरील स्थगितीमुळे निर्माण झालेला वाद आणखी तीव्र होत आहे.
 
