वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांचे कॅम्प कमांडंट कर्नल संतोष नवगण सर यांच्या  मार्गदर्शनाखाली दिनांक 24/10/2025 ते 02/ 11/ 2025 या कालावधीमध्ये शिबिर आयोजित केले आहे. शिबिरामध्ये लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यातून सुमारे 250 कॅडेट सहभागी होत आहेत. या शिबिराचे उद्घाटन कॅम्प ऍडम कमांडर कर्नल वाय. बी. सिंग सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कॅम्प सुभेदार मेजर शंभू सिंग सर तसेच लेफ्टनंट डॉ. अरुण गंभीरे उपस्थित होते. 

सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सर्वप्रथम लेफ्टनंट डॉ. अरुण गंभीरे यांनी संस्था तसेच महाविद्यालयाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना कॅम्प ऍडम कमांडर कर्नल वाय. बी. सिंग सर म्हणाले की,एकाच वेळी स्वतंत्र झालेले भारत आणि पाकिस्तान यांचा विचार करता भारताने विविध क्षेत्रांमध्ये पाकिस्तान पेक्षा चांगली प्रगती केलेली आहे. व 4यामागे आपले पूर्वज आणि त्यांनी घालून दिलेले संस्कार तसेच चांगले कर्म आहेत. आपणाला पण हीच परंपरा कायम ठेवायची आहे. 2047 यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने तुमच्या पिढीने देशाला पुढे नेण्याचे काम करणे गरजेचे आहे. या शिबिरामध्ये तुम्ही संरक्षण दलाच्या शेड्युलमध्ये राहणार आहात. समाजाला व देशाला प्रेरणादायी, खुश आणि जबाबदार नागरिक देण्यासाठी हे शिबिर आहे. या शिबिरामध्ये कवायत, विविध खेळ, फायरिंग चा सराव, मॅप रीडिंग आणि परिसर स्वच्छता व सुशोभीकरण यावर भर देण्यात येणार आहे. जीवनामध्ये एकता आणि शिस्त महत्त्वाची आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ. अरुण गंभीरे यांनी केले तर आभार कॅम्प सुभेदार मेजर शंभू सिंग यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी शिबिरार्थी कॅडेट्स आणि स्टाफ उपस्थित होते.

 
Top