नळदुर्ग (प्रतिनिधी)- येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी शहरात व तालुक्यात भाजपकडून करण्यात आलेल्या विकास कामाची माहिती मतदारापर्यंत पोहोचवून मतदारांकडून भाजपला मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करावा. असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग येथे भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.
नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नळदुर्ग येथे भाजपची कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास भाजपाचे नेते सुनीलाराव चव्हाण, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपाचे शहराध्यक्ष बसवराज धरणे, माजी उपनगराध्यक्ष नय्यर जहागिरदार, सुशांत भूमकर, दत्तात्रय कोरे, आदी उपस्थित होते. नळदुर्गला आता अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू झाले आहे. नळदुर्गच्या पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक किल्ला हा चालविण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून लवकरच शासकीय तंत्रनिकेतनचा प्रस्ताव ही सादर केला जाणार आहे. त्यामुळे भाजपने शहरात केलेले विकास कामे आणि कार्य लोकांपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे असे आमदार पाटील म्हणाले.
यावेळी नितीन काळे, बसवराज धरणे, शिवाजी गायकवाड व नय्यर जहागिरदार यांची भाषणे झाली. यावेळी माजी नगरसेवक सुधीर हजारे, निरंजन राठोड, संभाजी कांबळे, सिराज काझी, जिलानी कुरेशी, स्वप्नील काळे, संजय विठ्ठल जाधव, बबन चौधरी, सागर हजारी, शिवाजी घुगे, गणेश मोरडे, छमाबाई राठोड, कैलास चव्हाण, पांडुरंग पुदाले यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.