धाराशिव (प्रतिनिधी)- दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण. पण समाजातील काही घटक अजूनही या आनंदापासून दूर आहेत. अशा बांधवांच्या चेहऱ्यावरही दिवाळीचा उजेड फुलवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या सेवाभारती धाराशिव यांच्या वतीने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील साठे चौक परिसरातील पारधी पिढी आणि फकिरा नगर येथे स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष जाऊन स्थानिकांसोबत दिवाळी साजरी केली. येथे राहणाऱ्या कुटुंबांना मिठाई सह फराळाचे किट वाटप करण्यात आले, तर ओवाळणीच्या निमित्ताने महिलांना साडी देऊन त्यांच्या आनंदात भर घातली. या उपक्रमादरम्यान स्वयंसेवकांनी बालकांसोबत खेळत, त्यांना गोडधोड देत एक वेगळाच दिवाळीचा अनुभव निर्माण केला. सेवा भारतीच्या या उपक्रमाने समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या सणाच्या आनंदात सामावून घेण्याचा हा प्रयत्न अनेकांच्या मनाला भिडला यावेळी सेवाभारती चे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रसाद धर्म, सचिव डॉ.शतानंद दहिटणकर, डॉ.पंकज शिनगारे ,जिल्हा संघचालक ॲड. रविंद्र कदम उपस्थित होते.
