धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं तब्बल 31 हजार 628 कोटींचं मदतपॅकेज ही दिलासादायक आणि वेळेवरची घोषणा असल्याचं मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केलेलं हे पॅकेज केवळ आकड्यांपुरतं न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरले. तर हजारो शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी बळ मिळेल. अशी अशा व्यक्त केली आहे. खरडून गेलेल्या जमिनींना तसेच घरं व जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांसह शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वांगीण मदत देण्याची राज्य सरकारची भूमिका ही खऱ्या अर्थाने मोठा आधार देणारी आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या दुःखात भागीदार म्हणून कार्यरत असून धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांतही गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली. कळंब, धाराशिव, वाशी, भूम या तालुक्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. या भागांतील पिकांची पाहणी करून शासनानं तातडीने पंचनाम्याचे काम हाती घेतले होते याबद्दल प्रशासनाचेही आभार मानायला हवे. आता या पॅकेजमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवीन घरं, जनावरांच्या नुकसानीसाठी रोख मदत, तसेच शेतीसाठी रोख आणि मनरेगा माध्यमातून निधी ही संपूर्ण व्यवस्था पुन्हा उभी राहण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. राज्य सरकारने या संकटाकडे ओला दुष्काळ म्हणून पाहण्याचा घेतलेला निर्णयही दूरदृष्टीचा आहे. महसूल वसुली, कर्ज पुनर्गठन, परीक्षा शुल्क माफी अशा अनेक सवलतींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा मिळणार आहे.