परंडा (प्रतिनिधी )-धाराशिव- जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुराच्या काळात वर्ग १ आणि वर्ग २ दर्जाचे काही अधिकारी आदेश डावलून मुख्यालयी गैरहजर राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी वंचित बहुजन आघाडी धाराशिवच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

 महापुराच्या काळात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे, जनावरे आणि शेती उद्ध्वस्त झाली असताना काही अधिकारी मात्र आपल्या कर्तव्यस्थळावर अनुपस्थित राहून स्वतःच्या संसारात रमल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "महापूराच्या काळात जिल्हा प्रशासनाने सर्व अधिकारी मुख्यालयी उपस्थित राहावेत,असा आदेश असतानाही काहींनी तो आदेश धाब्यावर बसविला.त्यामुळे अशा कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांचे पुरकाळातील लोकेशन व येडशी-तामलवाडी व औसा रोडवरील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषी अधिकारी ओळखून कठोरातील कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी."

 या मागणीसंदर्भात वंचित बहुजन आघाडी धाराशिवचे जिल्हाध्यक्ष अँड.प्रणित डिकले, जिल्हा संघटक विकास बनसोडे, आनंद गाडे, नंदकुमार हावळे आणि किरण धाकतोडे आदींची उपस्थिती होती.वंचित बहुजन आघाडीने इशारा दिला आहे की, जर दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील.

 
Top