भूम (प्रतिनिधी)- येथील शेतकरी उमेश रघुनाथ शिंदे माळी यांची हुशार आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या बारावी विज्ञान शाखेतील मुलगी अंजली हिचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले आहेत. तिला तातडीने प्रत्यारोपणाची गरज आहे. मात्र, अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या शिंदे कुटुंबासमोर लाखो रुपयांच्या उपचाराचा डोंगर उभा राहिला आहे.
भुम तालुक्यातील ईट येथील उमेश शिंदे माळी यांच्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. पत्नीसह दोन मुले आणि अंजली असे त्यांचे पाच जणांचे कुटुंब आहे. अंजली हुशार असल्याने वडिलांनी तिला भूम येथील शंकराव पाटील महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी वडील गेली तीन वर्षांपासून सालगडी म्हणून काम करत आहेत. यावर्षी दीड एकर शेतीत अतिवृष्टीमुळे केवळ तीन पोते सोयाबीनचे उत्पादन झाले, ज्यामुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून अंजली आजारी असल्याने तिचे वडील तिला बार्शी येथे उपचारासाठी घेऊन जात होते. पण, दोन महिन्यांपूर्वी तिचा आजार बळावला. यामुळे त्यांनी शिर्डी, मुंबई, पुणे येथील मोठ्या दवाखान्यात नेऊन तपासण्या केल्या.
त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिचे दोन्ही मूत्रपिंड खराब झाल्याचे सांगून त्वरित प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, प्रत्यारोपणासाठी अंजलीची आजी, आई आणि वडील तयार आहेत, पण यासाठी लागणारा लाखोंचा खर्च पेलण्याची कुटुंबाची ताकद नाही. उपचारासाठी वडिलांनी सालगडी कामाची उचल घेतली होती, ती देखील संपली आहे. सध्या अंजलीवर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, पैशांअभावी पुढील मोठे उपचार थांबले असल्याचे उमेश माळी म्हणाले. दरम्यान अंजलीचे उपचारासाठी ईट येथे वैद्यकीय सेवा देत असलेले डॉक्टर अभिजीत गंभीरे यांनी आज पासून आपल्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून ओपीडी फीस न घेता ती फीस एका बॉक्समध्ये जमा करून ती अंजलीच्या उपचारासाठी देणार असल्याचा अभिनव उपक्रम डॉक्टर गंभीर यांनी दाखवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
 
