धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील अलीकडील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साथरोगांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य विभाग सज्ज झाला असून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिली आहे.
पूरग्रस्त भागात प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत 9 आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये परंडा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय परंडा,प्रा.आ.केंद्र अनाळा व जवळा,भूम तालुक्यात ग्रामीण रुग्णालय भूम,प्रा.आ.केंद्र वालवड व पाथरुड,कळंब तालुक्यात उपकेंद्र खामसवाडी तसेच धाराशिव तालुक्यात ग्रामीण रुग्णालय तेर व प्रा.आ.केंद्र पढोली येथे शिबिरे होत आहेत. या शिबिरांमध्ये सर्व रोग तज्ञ,बालरोग तज्ञ,आयुष सेवा,मानसिक आरोग्य समुपदेशन,मोबाईल मेडिकल युनिट, रक्त तपासणी व मोफत औषध वितरण यांचा समावेश आहे.तसेच जिल्ह्यातील 58 गावांमध्ये स्थानिक पातळीवर आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहेत. साथरोग प्रतिबंधासाठी 1 कोटीची तरतूद करून सदर निधी जिल्हा समितीकडून पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आला आहे.या निधीतून औषध खरेदी,धूर फवारणी, पाणी शुद्धीकरण,डास प्रतिबंधक औषधे (अबेट) इत्यादी उपाययोजना राबविल्या जात आहेत. डॉ.विजय कंदेवाड,संचालक (आरोग्य सेवा) पुणे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून आरोग्य शिबिरे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.