धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या काळात जिल्हा प्रशासन व यंत्रणांनी मेहनत करून चांगले काम केले आहे.त्यामुळे शेवटच्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचता आले.जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीची भूमिका महत्त्वाची आहे.या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेवटच्या माणसाचा विकास व्हावा हाच आपला प्रयत्न आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीची सभा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली,यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री.सरनाईक बोलत होते.सभेला आमदार सर्वश्री राणाजगजितसिंह पाटील,विक्रम काळे,कैलास घाडगे पाटील,प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,सहाय्यक जिल्हाधिकारी रैवैयाह डोंगरे व जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरनाईक म्हणाले की, जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहता 22 कोटी रुपयांच्या कामांना शासनाने मान्यता दिली आहे.180 कोटी रुपयांच्या कामांना शासनाने निकष लावून कामे करण्याचे निर्देश दिले आहे. या निधीचा वापर जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी करण्यात येईल.ज्या ठिकाणी कामाची आवश्यकता आहे,तेथेच कामे करण्यात येतील. लोकांची कामे झाली की त्यांना दिलासा मिळतो, असे ते म्हणाले. आमदार काळे यांनी विद्युत विभागामधील कामासंदर्भात काही सुचना केल्या. 


पालकमंत्र्यांना घेरावा

बैठकीनंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक गाडीकडे निघाले असता महाविकास आघाडीच्यावतीने घेराव घालून 140 कोटींच्या स्थगितीचे काय? शहरातील कचरा कधी हटवणार? येत्या काही दिवसात विकास निधीवरील स्थगिती नाही उठविल्यास पालकमंत्री यांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. अशा इशारा शिवसेना उबाठा गटाचे सोमनाथ गुरव यांनी दिला. तर डॉ. स्मिता शहापूरकर यांनी तुमच्या राजकीय कुरघुडीमुळे शहरवासियांचे हाल चालू आहेत असे म्हणत संताप व्यक्त केला. आमदार कैलास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना 183 कोटी रूपयांचे विकास कामे का वगळली आहेत, त्याचे कारणे सभागृहासमोर द्यावे लागतील. असे सांगितले. 

 
Top