धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील जनतेला 18 महिने खड्ड्यातून प्रवास करावा लागला. अनेकांना खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला, या खड्ड्यांची जबाबदारी कोणाची आहे. असा प्रश्न उपस्थितीत करून, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी 60 कोटी रूपये या कामात वाचविले आहेत हे म्हणणे अत्यंत चुकीचे असून, दिशाभूल करणारे आहे. अशी टिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 

शिवसेना उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 140 कोटींच्या शहरातील रस्त्यांच्या कामावर जाहीर चर्चा करण्यासाठी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात या, असे थेट आव्हान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना दिले. दरम्यान, लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाल्यानेच यांचा तिळपापड होत आहे, असा पलटवार भाजपने केला आहे. शहरातील रस्त्यांच्या 140 कोटींच्या रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश काढण्यात आला आहे. या संदर्भात भाजपच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषद घेवून माहिती देण्यात आली. या पार्श्वभुमीवर खासदार राजेनिंबाळकर व आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी, रोहित बागल, सिध्दार्थ बनसोडे आदी उपस्थित होते. 

यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की, कार्यारंभ आदेश दिल्यानंतर आता येथून पुढे 18 महिन्यात रस्त्यांची कामे पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला आपल्या लाडक्या कंत्राटदाराला काम मिळण्यासाठी खो घालण्यात आला. यामुळे तब्बल 18 महिने काम रखडले. यासाठी 15 टक्के अधिक रकमेची निविदा प्रक्रिया मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. या सर्व गोंधळात निविदा प्रक्रियेवर निर्णय घेण्यासाठी मोठा कालावधी गेला. या कामाला 23 फेब्रुवारी 2024 ला प्रशासकीय मंजुरी मिळाली. सात दिवसात निविदा प्रक्रिया राबवणे बंधनकारक होते, तर 90 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. 18 महिने होवूनही निविदा उघडली नव्हती. कोणाचे भले करण्यासाठी धाराशिवकरांना वेठीला धरण्यात आले, याची चौकशी करण्यासाठी आम्ही एसआयटीची मागणी करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली नाही तर न्यायालयात जाण्याचाही इशारा त्यांनी दिला. खासदार राजेनिंबाळकर म्हणाले, आतापर्यंत प्रत्येक कामाला खोडा घालण्याचे काम यांनीच केले. महाविकास आघाडीने यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जितील लोकांना काम मिळण्यासाठी धाराशिवकरांचे प्राण पणाला लावले. यामध्येसत्य शोधण्यासाठी एसआयटीचा पर्याय आहेच. परंतु हिमंत असेल तर तुळजाभवानीच्या मंदिरासमोर थेट चर्चेला यावे, तेथेच दुध का दुध, पाणी का पाणी होईल. मात्र चर्चेसाठी कोणत्या बुजगावण्याला पाठवू नये असेही ते म्हणाले. 


22-23 ची दर सुची

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामात आपण 60 कोटी रूपये वाचविले असा दावा करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी 2024-25 च्या दर सुचीप्रमाणे का न करता 22-23 च्या दर सुची प्रमाणे काम करण्यास लावले असे सांगितले होते. यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्यात सर्वत्र 2022-23 ची दर सुची लागू आहे. त्यामुळे राणा पाटील यांनी केलेला दावा किती फोल आहे असे सांगितले. 


 
Top