धाराशिव (प्रतिनिधी)- पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह,नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे आयोजित केली आहे.
या बैठकीत 1 मे 2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालनास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण,अनुसूचित जाती उपयोजना,आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासीसाठी उपयोजना) सन 2025-26 चा माहे सप्टेंबर 2025 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येईल.तसेच पालकमंत्री सरनाईक यांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येईल.
स्थगिती उठणार का?
राजकीय कुरघुडीमुळे गेल्या अडीच वर्षापासून विकास निधीसह अन्य निधीवर भाजप ने मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती आदेश आणाला आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी काही दिवसापूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील, ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या सोबत आमची बैठक झाली असून, आमदार पाटील यांचे समाधान झाले आहे. त्यामुळे लवकरच स्थगिती उठेल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. परंतु विकास निधीवरील स्थगिती अद्याप उठली नसल्याचे सुत्रांने सांगितले. या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही सीएम कार्यालयाकडून विकास निधीवरील स्थगिती उठवण्याबाबत कोणतेही पत्र व आदेश आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शहरास जिल्ह्यातील रस्त्यासह अन्य विकास कामे ठप्प आहेत. 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत चालू वर्षातील विकास निधी संदर्भात आढावा घेणार असल्याचे समजते.