नळदुर्ग (प्रतिनिधी)- संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केलेल्या 8 मागण्या पैकी 6 मागण्या शासनाकडून मान्य करून जी आर काढल्यामुळे येथील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मराठा समाजातील कांहीं तरुणांनी बस स्थानक परिसरात फटाके फोडून, पेढे वाटून आणि गुलाल उधळून जल्लोष केला.
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनास आज अखेर यश आले. मनोज जरंगे पाटील गत 29 ऑगस्ट पासून मुंबई येथे उपोषणास बसलेले होते त्यास प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. अख्खी मुबंई मराठा आरक्षण समर्थकांनी भरून गेली होती. आज त्यास यश मिळाले. राज्य सरकारच्या शिष्ठ मंडळाने आझाद मैदान येथे येऊन जरंगे पाटील यांची भेट घेतली व जरंगे यांच्या सर्व मागण्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या. त्यामुळे मराठा समाजासह नळदुर्ग शहरातील सर्व नागरिकांनी निर्णयाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपाचे सुशांत भूमकर, माजी नगरसेवक संजय बताले, संजय मोरे, मोहन बाबरे, संजय विठ्ठल जाधव, बलदेव ठाकूर, समीर मोरे, पप्पू पाटील, दुबे दादा, बिटू मुळे, भीमा बताले, महादेव हत्ते, खय्युम शेख, नविद शेख,अम्मुलाल शेख आदीसह नागरिकांनी जल्लोष साजरा केला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आरक्षणानंतर झालेली फसवणूक व मागील घडामोडींमुळे सावध भूमिका घेत सकल मराठा समाजातील कांहीं तरुणांनी जल्लोष केला. पण बहुतांशी मराठा समाजाने यातील खाच खळगे काय आहेत हे अद्याप ही समजले नसल्याने वेट अँड वॉच अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले.
