धाराशिव (प्रतिनिधी)- सणासुदीत विशेष म्हणजे गणेशोस्तव आणि गौरी पूजन काळात घरोघरी गौरी पूजन केले. या निमित्ताने बालाजी नगर येथील राठोड कुटुंबीयांनी आपल्या घरात बंजारा समाजाच्या पेहरावात लक्ष्मी मूर्ती साकारल्या आहेत. त्यांच्या या वैविध्यपूर्ण गौरी आणि गणपती बाप्पाचे संपूर्ण जिल्हावासियानी लक्ष वेधले आहे.
धाराशिव शहरातील बालाजी नगर येथील नामदेव राठोड यांनी आयुष्यभर एस्टी महामंडळात सेवा केली. सेवावृत्तीचे आणि विविध कौशल्याचे बळ तेव्हापासून त्यांच्या अंगी होते. त्यांच्या कुटुंबातील पत्नी शाहुबाई राठोड, पुत्र विकास राठोड, आकाश राठोड, आई ताईबाई राठोड यांनी यावर्षी प्रथमच आपल्या घरात बंजारा समाजाच्या पेहरावात लक्ष्मी मूर्ती साकारण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे त्यांनी लक्ष्मी मूर्तीच्या पेहरावसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव केली. त्यासाठी आवश्यक असणारी चवली, पावली, काचेचे तुकडे आणि इतर साहित्य जमा करून हुबेहुब बंजारा समाजाच्या महिला जसा पारंपरिक पद्धतीने पेहराव करतात त्याप्रमाणे गौरीची वेशभूषा साकारली आहे.
गौरीच्या माथ्यावर बंजारा समाजातील पारंपरिक घुंघट, काथळी आणि फेट्या म्हणजेच राजस्थानी भाषेतील घागरा चोळी असा सुंदर पेहराव या कुटुंबाने यावर्षी प्रथमच सादर केला आहे. त्यामुळे हा देखावा सर्व बंजारा समाजातील कुटुंबीयांसह धाराशिव जिल्हावासियांचे लक्ष वेधून घेत आहे.
